दक्षिण काशी हरिहरेश्वर येथील भ्रमणध्वनी सेवा वारंवार ठप्प

दक्षिण काशी हरिहरेश्वर येथील भ्रमणध्वनी सेवा वारंवार ठप्प
Published on

हरिहरेश्वर येथे मोबाईल सेवेचा बोजवारा
सेवा खंडित होत असल्याने व्यावसायिकांसह पर्यटकांना मनस्ताप

श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तसेच भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी (मोबाईल) सेवा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिकांसह पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे नामांकित तीन कंपन्यांनी मोबाईल सेवा सुरू केल्याने नागरिकांसह व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घेता आला. इंटरनेट माध्यमातून आलेल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जावे या दृष्टीने व्यावसायिकांनी डिजिटल पेमेंट सेवा उपलब्ध केली. सद्यःस्थितीत हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवा वारंवार ठप्प होत असल्याने कॅशलेस व्यवहारांना अडथळा निर्माण येत आहे. यामुळे व्यावसायिकांसह पर्यटकांची गैरसोय होताना दिसते. हरिहरेश्वरला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. येथे अनेक वेळा अपघातही घडतात. तेव्हा बचावकार्याशी संपर्क साधताना अडथळाही निर्माण होतो. त्यामुळे या महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी वाढत आहे.

-------------
बँक, शासकीय कार्यालये तसेच ऑनलाइन नोकरी व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘नो कनेक्टिव्हिटी’मुळे नुकसान होत आहे. जनगणनेचे काम मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने होत आहे. ही प्रक्रिया १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडत आहे. याकरतिा हरिहरेश्वर येथील मोबाईल सेवा अखंडित असावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
-----------------
कंपनीमार्फत खुलासा
एकाच वेळी एकाच टॉवरवरून अनेक मोबाईल ग्राहक हे इंटरनेट किंवा कॉल करत असल्यास नेटवर्क जाम होते. यामुळे कॉल ड्रॉप होणे किंवा इंटरनेट बंद पडणे असे प्रकार घडतात. टॉवरना सिग्नल प्रसारित करण्यासाठी सतत वीजपुरवठा आवश्यक असतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण उद्भवू शकते. अशा कारणांमुळे संबंधित क्षेत्रातील भ्रमणध्वनी सेवा खंडित होऊ शकते, असा खुलासा कंपनी प्रतिनिधीने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
-------------
हरिहरेश्वर येथे भ्रमणध्वनी सेवा बंद पडत असल्याने आम्हा व्यवसायीकांना फटका बसतो. पर्यटक खरेदी करून झाल्यावर डिजिटल पेमेंटसाठी आग्रही असतात. नेटवर्क नसल्यास त्याची अडचण होते व अनेक वेळा वादविवाद होतात. येथील तिन्ही भ्रमणध्वनी कंपन्यांनी आपल्या सेवेत सुधारणा करावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
- सचिन गुरव, व्यावसायिक

Marathi News Esakal
www.esakal.com