आधारवाडी कचराभूमी पुन्हा धगधगली

आधारवाडी कचराभूमी पुन्हा धगधगली
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कल्याण-डोंबिवलीतील आधारवाडी कचराभूमी पुन्हा एकदा आगीच्या घटनांमुळे चर्चेत आली आहे. दररोज संध्याकाळी लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोट, तीव्र दुर्गंधी आणि वाढते प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही महिन्यांपूर्वी नियंत्रणात आलेली परिस्थिती पुन्हा बिघडू लागल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काही महिन्यांपर्यंत आधारवाडी आणि बारावे कचराभूमी परिसरात कचरा वेचक आणि भंगार गोळा करणाऱ्यांवर कठोर नियंत्रण ठेवण्यात आले होते. त्यामुळे कचराभूमीवरील आगींचे प्रकार जवळपास थांबले होते; मात्र घनकचरा विभागातील बदल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही भंगार वेचकांकडून कचराभूमीत जाणीवपूर्वक आग लावली जात आहे. त्यानंतर जळालेल्या कचऱ्यातून लोखंड, पितळ आणि इतर धातू वेचले जात आहेत. त्यामुळे दररोज सायंकाळी आधारवाडी कचराभूमीत आग लागल्याचे प्रकार घडत आहेत. या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवत असून पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे आधारवाडी कचराभूमीचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला असून नागरिकांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

जुन्या समस्यांचे डोके वर
यापूर्वी घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांकडून कचराभूमीवर नियमित पाहणी केली जात होती. बाहेरील व्यक्तींना प्रवेश रोखण्यासोबतच कचऱ्यातून पुनर्वापरयोग्य वस्तू वेगळ्या करून महसूल निर्मितीचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे अनधिकृत हालचालींवर काही प्रमाणात नियंत्रण आले; मात्र आता देखरेख कमी झाल्याने जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com