

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात घेण्यात आलेली मेट्रोची चाचणी, उद्घाटनाच्या घोषणा आणि वेळोवेळी बदलणाऱ्या डेडलाइन्स यामुळे ठाणेकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकीकडे सरकारकडून प्रकल्प वेगाने सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी दुसरीकडे प्रत्यक्षात स्थानकांची अपूर्ण कामे, कारशेडचा रखडलेला प्रश्न आणि धूळखात असलेला ट्रायल रनचा डबा यामुळे ‘मेट्रो कधी धावणार,’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गायमूख ते कासारवडवलीदरम्यान मेट्रोची चाचणी सप्टेंबर २०२५ मध्ये घेतली. पालिका निवडणूक तोंडावर असल्याने त्या वेळी हा प्रकल्प वेगाने मार्गी लागत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र, ज्या डब्यातून ही चाचणी घेण्यात आली, तोच डबा आज प्रकल्प परिसरात धूळखात पडून आहे. वास्तवित चाचणीच्यावेळी सुरुवातीला डिसेंबर २०२५ पर्यंत कॅडबरी जंक्शन ते गायमूख असा मेट्रो प्रवास सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे निदान ठाण्यातल्या ठाण्यात मेट्रोने प्रवास करण्याचे स्वप्न ठाणेकरांनी रंगवले, पण त्यानंतर मार्च २०२६ ची नवी डेडलाइन देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आता २०२६ च्या अखेरपर्यंत तरी हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होईल का, याबाबतच शंका व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गायमूख ते कापूरबावडी हा भाग ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यानंतर कापूरबावडी ते गांधीनगर (कांजूरमार्ग) हा दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण वडाळा ते गायमूख मार्ग २०२७ पर्यंत कार्यान्वित होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, पण मेट्रोच्या मार्गावर अनेक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी केवळ संरचना उभारली असून, एस्कलेटर, प्लॅटफॉर्म, विद्युत यंत्रणा आणि प्रवेशमार्गांची कामे अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे ट्रॅक तयार झाला तरी प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत तयारी अपुरी असल्याचे दिसून येत आहे.
घोडबंदर रोडवरील लाखो प्रवाशांना अजूनही तासन्तास कोंडीत अडकून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ‘मेट्रोचे स्वप्न दाखवले, पण प्रत्यक्ष प्रवास कधी,’ असा सवाल आता सर्वसामान्य ठाणेकर उपस्थित करत आहेत.
मोगरपाडा कारशेडचा अडथळा
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा म्हणजे मोगरपाडा कारशेड. मेट्रोच्या देखभाल, पार्किंग आणि तांत्रिक संचालनासाठी कारशेड अत्यावश्यक मानले जाते. मात्र, या कारशेडचे काम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने, मेट्रोची नियमित सेवा सुरू करण्यात मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अन्य कामे अपूर्णावस्थेत
वाहतूकतज्ज्ञांच्या मते, ‘चाचणी हा केवळ प्रतीकात्मक टप्पा असतो. प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यासाठी स्थानके, सिग्नल यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि कारशेड यांची साखळी पूर्ण क्षमतेने कार्यरत असणे आवश्यक असते.’ ही सर्वच कामे अपूर्णावस्थेत असल्याने २०२६ च्या अखेरपर्यंत ठाणेकरांना मेट्रो प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘घोषणांचा वेग’ विरुद्ध ‘कामांचा वेग’
ठाणे मेट्रो प्रकल्प गेल्या काही वर्षांत राजकीय घोषणांचा केंद्रबिंदू ठरला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे टप्पे, चाचणी आणि उद्घाटनाच्या तारखा यांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात डेडलाइन वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.