प्रसूतिगृहात सोनोग्राफीच्या नावाखाली लूट?

प्रसूतिगृहात सोनोग्राफीच्या नावाखाली लूट?
Published on

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा प्रसूतिगृहात सोनोग्राफीच्या नावाखाली गर्भवती महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका तथा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
टिटवाळ्यातील रुक्मिणी प्लाझा हे प्रसूतिगृह खासगी कंत्राटदारामार्फत चालविले जाते. करारानुसार सोनोग्राफीसाठी ४०० रुपये आकारले जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८०० ते ९०० रुपये घेतले जात असून ग्रामीण भागातील महिलांकडून तर २४०० रुपये आकारले जात असल्याचा दावा भोईर यांनी केला. या संदर्भात भाजप नगरसेवक मंदार हळबे यांनीही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, खासगी कंत्राटदारामार्फत सर्वसामान्य महिलांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. गर्भवती महिलांसाठी पहिल्या दोन सोनोग्राफी मोफत असाव्यात आणि त्यानंतरच्या सोनोग्राफीसाठी ४०० रुपये आकारले जावेत, अशी तरतूद असताना प्रत्यक्षात जादा रक्कम उकळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे उपचारासाठी येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोठा फटका बसत असल्याचेही सभागृहात नमूद करण्यात आले. या आरोपांनंतर स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे हा विषय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे.

मुदतवाढ प्रस्तावाला आक्षेप
स्थायी समितीसमोर वेस्टर्न हेल्थ कन्सल्टन्सी या कंपनीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विषय मंजुरीसाठी आला होता. या कंपनीमार्फत रोज तीन हजार रुपये दराने मनुष्यबळ पुरविणे, प्रयोगशाळा तपासण्या आणि सोनोग्राफी सेवा देण्याचे काम केले जाते. निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मुदतवाढ प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावालाच नगरसेविका भोईर यांनी आक्षेप घेतला.

चौकशी अहवाल सादर करणार
आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, टिटवाळ्यातील प्रसूतिगृह ५० खाटांचे आहे. गेल्या वर्षभरात येथे ३७१ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे, तर ८१७ महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली आहे. तसेच ती हजार २२९ महिलांनी सोनोग्राफी सेवांचा लाभ घेतला आहे. महापालिकेकडून पहिल्या दोन सोनोग्राफींसाठी प्रत्येकी ४०० रुपये याप्रमाणे एकूण ८०० रुपये कंत्राटदाराला दिले जातात. त्यानंतरच्या सोनोग्राफीसाठीही निश्चित दर आकारणे अपेक्षित आहे. मात्र कंत्राटदाराकडून जादा पैसे घेतले जात असल्यास ती गंभीर बाब असून, त्याची चौकशी करून अहवाल स्थायी समितीसमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन बोरकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com