देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री; ग्राहकांची फसवणूक

देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री; ग्राहकांची फसवणूक
Published on

देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री; ग्राहकांची फसवणूक

तुर्भे, ता. १० (बातमीदार) : कोकणातील प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर ओळख असलेल्या देवगड हापूस आंब्याचा हंगाम आता आटोपत आला असतानाही बाजारात ‘देवगड हापूस’च्या नावाखाली इतर राज्यांतील आंब्यांची विक्री होत असल्याचे प्रकार पुन्हा समोर आले आहेत. वाढती मागणी, आकर्षक भाव आणि ग्राहकांमधील लोकप्रियता याचा फायदा घेत काही व्यापारी केरळ, कर्नाटक तसेच इतर भागांतील आंबे देवगड हापूस म्हणून विक्रीस ठेवत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.

सध्या राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये देवगड हापूसचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरी हापूसची आवकही २० मेपर्यंत राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे. त्यानंतर २५ मेपासून जुन्नर हापूस बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात अलिबाग, मुरूड-जंजिरा आणि बाणकोट परिसरातील हापूस आंब्यांची विक्री सुरू आहे. मात्र, देवगड हापूसचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असतानाही बाजारात मोठ्या प्रमाणावर “देवगड हापूस” नावाने इतर राज्यांतील आंबे विकले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
----------------
ग्राहकांची फसवणूक
देवगड हापूसला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले असल्याने त्याची स्वतंत्र आणि विशेष ओळख आहे. रंग, सुगंध, चव, कमी तंतुमय गर आणि टिकाऊपणा यामुळे देशासह परदेशातही देवगड हापूसला मोठी मागणी असते. त्यामुळे बाजारात या आंब्याला इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक भाव मिळतो. याचाच गैरफायदा घेत काही किरकोळ व्यापारी ग्राहकांना चुकीची माहिती देऊन बनावट विक्री करत असल्याचा आरोप उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे अस्सल देवगड हापूस उत्पादकांना आर्थिक फटका बसत असून, ब्रँडची विश्वासार्हताही धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक ग्राहक केवळ नाव आणि बाह्य रंग पाहून आंबे खरेदी करतात. मात्र, चव, सुगंध आणि गराच्या गुणवत्तेमध्ये फरक जाणवत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com