

नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपाचा पुढाकार
विविध ठिकाणी बसविले लोखंडी पाइप
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : नेरूळ (पश्चिम) परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या फुटपाथवर दुचाकी आणि चार चाकी वाहनचालक सर्रास आपली वाहने चालवत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. पादचारी आणि जॉगिंग करणाऱ्या नागरिकांचा अपघात होण्याचा धोका अधिक असल्याने सदर ठिकाणी लोखंडी पाइप (बोलार्ड) बसवावेत. जेणेकरून वाहने फुटपाथवरून चालणार नाहीत, अशी मागणी शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप आमले यांनी नवी मुंबई पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल मनपा प्रशासनाने घेत विविध ठिकाणी लोखंडी पाइप बसवले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नेरूळ (पश्चिम) मधील विक्रम हॉटेल परिसर, सी.यू.व्ही. सोसायटी, शिव पाम बीच टॅक्सी स्टँड, त्रिमूर्ती वाचनालय, ज्येष्ठ नागरिक बैठक व्यवस्था आदी परिसरातील फुटपाथवरून सर्रास दुचाकी आणि चार चाकी वाहनचालक आपली वाहने चालवत असतात. विशेष म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुले फुटपाथवरून चालत असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ असते. मात्र, यांचेही भान या वाहनचालकांना नसते. फुटपाथ हा पादचारी नागरिकांसाठी निर्माण केलेला असून, त्याच्यावर ये-जा करणे त्यांचा अधिकार आहे, असे असताना फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना वाहनाचा वेग चुकवत चालावे लागत आहे. सदर बाब दिलिप आमले यांच्या लक्षात आल्यावर नवी मुंबई मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन सदर ठिकाणी नागरिकांना सुरक्षितपणे आणि वाहनांची भीती न बाळगता चालता यावे म्हणून तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी लोखंडी पाइप (बोलार्ड) बसवून फुटपाथ सुरक्षित केला. या उपाययोजनेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, गरोदर स्त्रिया तसेच शाळकरी मुलांना सुरक्षितपणे फुटपाथवरून चालता येणार आहे. लोखंडी पाइप बसवल्याने अपघाताचा धोका कमी झाला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.