बीट पोलिसांची करडी नजर

बीट पोलिसांची करडी नजर
Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने धोरणात्मक बदलाची घोषणा केली आहे. वाढत्या शहरीकरणाला आणि त्यासोबत बदलणाऱ्या गुन्हेगारीच्या स्वरूपाचा सामना करण्यासाठी जनसंवाद आणि संवेदनशील भागांमध्ये बीट पोलिस चौक्यांचा तत्काळ विस्तार करण्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जाहीर केले. नागरिकांच्या थेट सहभागातून गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याला मुळापासून उपटून टाकणारा हा एक प्रयोग ठरणार आहे.

नवी मुंबई शहरात पारंपरिक गुन्हेगारीच्या जोडीला आता आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर फसवणूक यांसारख्या आव्हानांनी डोके वर काढले आहे. त्यांचा सामना करण्यासाठी पोलिस यंत्रणेची पुनर्रचना करणे आणि स्थानिक पातळीवर पोलिसांची सक्रिय उपस्थिती निर्माण करणे अनिवार्य बनले आहे. अलीकडेच मंजूर झालेल्या दोन महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची भर पडल्यामुळे ही संख्या आता २२ वर पोहोचली आहे. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस ठाणे आणि स्वतंत्र उलवे पोलिस ठाणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

सुरक्षेची नवीन रणनीती
नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक स्तरावर गुन्हेगारीच्या प्रतिबंधासाठी ‘बीट मार्शल’ आणि ‘बीट पोलिस चौक्या’ या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचे ठरविले आहे. एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलिस तपासाची चक्रे फिरवण्याऐवजी, तो गुन्हा घडूच नये, यासाठी ही ‘प्रतिबंधात्मक पोलिस उपस्थिती’ महत्त्वाची ठरते. या पद्धतीमध्ये संपूर्ण शहराचे छोटे-छोटे भौगोलिक प्रभाग म्हणजेच ‘बीट्स’ पाडले जातात आणि प्रत्येक बीटसाठी एका विशिष्ट बीट मार्शलची नियुक्ती केली जाते.

संशयास्पद हालचालींवर नजर
बीट मार्शल हे दुचाकी, सायकल किंवा पायी गस्त घालत असल्यामुळे त्यांना दाट लोकवस्तीच्या गल्ल्यांमध्ये आणि मुख्य बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश मिळतो. गर्दीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालयांचे परिसर आणि संवेदनशील गृहनिर्माण सोसायट्यांवर त्यांची सतत नजर असते. स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांच्या नियमित संपर्कात राहिल्यामुळे त्यांना परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती गुप्तहेरांपेक्षाही आधी आणि अधिक अचूकतेने मिळते.

‘आय-बाइक’ची जोड
गस्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘आय-बाइक’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या दुचाकीवर डिजिटल कॅमेरा, विशेष किट बॅग आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचे साहित्य उपलब्ध असते. गुन्हा घडल्यास ही बाइक तत्काळ घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक पुरावे सुरक्षितपणे जमा करण्याचे काम करते, जेणेकरून गुन्हेगाराला न्यायालयात कठोर शिक्षा देणे शक्य होते.

थेट जनसंवाद आणि पारदर्शक लोकसहभाग
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी रबाळे ठाण्याच्या हद्दीतील रबाळे, ऐरोली आणि घणसोली या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांची नुकतीच एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी मनोज हळदणकर, बंडू केणी, अंकुश सोनावणे, वैशाली पाटील, ऐश्वर्या सोनावणे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिल्पा केशवाणी व सुधीर कुमठेकर आदी उपस्थित होते. नागरिकांनी या बैठकीत वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीवर आणि अंतर्गत रस्त्यांवरील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत नवीन बीट चौक्या सुरू करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी या संवेदनशील भागात तत्काळ उपाययोजना करण्याचे आणि सीसीटीव्ही नेटवर्क अधिक मजबूत करण्याचे आश्वासन दिले.

गुन्हेगारी आणि तपासकामाची सद्यःस्थिती
नवी मुंबई पोलिसांनी तपासाच्या कामात सातत्य राखत दोषसिद्धी दरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. न्यायालयांमध्ये ठोस पुरावे सादर केल्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढत गेले आहे. २०२३ मधील ३६ टक्के असणारा दोषसिद्धी दर २०२४ मध्ये ४४ टक्के आणि २०२५ मध्ये ४६ टक्क्यांवर पोहोचला आहे.


नागरी सुरक्षेवरील दुहेरी ताण
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- न्हावा-शेवा बंदराचा विस्तार आणि उरणची संवेदनशीलता
- मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू
- मुंबई-पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग
- मुंबई-गोवा महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com