

७० टक्के बाल यकृत प्रत्यारोपणांत आईच जीवनदात्या
‘वाडिया’त मातांमुळे वाचले चिमुकल्यांचे प्राण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मातृदिन म्हणजे आईच्या निःस्वार्थ प्रेमाचा, त्यागाचा आणि आई व मुलांच्या अतूट नात्याचा सन्मान करण्याचा दिवस; मात्र काही वेळा हे मातृत्व केवळ काळजी घेण्यापुरते मर्यादित नसून आपल्या मुलाला नवे आयुष्य मिळवून देण्याचे कार्य करते. मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथे मातांनी आपल्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा भाग दान करून या मुलांना नव्या आयुष्याची भेट दिली.
मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथे आतापर्यंत झालेल्या १६ बाल यकृत प्रत्यारोपणांपैकी जवळपास ७० टक्के प्रत्यारोपणांमध्ये आईंनी स्वतःच्या यकृताचा भाग दान केला आहे. या प्रत्येक प्रत्यारोपणामागे आईच्या निःस्वार्थ प्रेमाची, त्यागाची आणि आपल्या बाळाला नवे आयुष्य मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष दिसून येतो.
३४ वर्षीय ज्योती विजय सिंह या मुंबईतील गृहिणीने आपल्या सहा वर्षांचा मुलगा प्रियांशसाठी आयुष्याचा मोठा निर्णय घेतला. प्रियांशला पोट सुजणे, भूक मंदावणे, अशक्तपणा, वजन घटणे आणि सतत थकवा जाणवणे, अशी लक्षणे दिसत होती. तपासणीनंतर त्याला ‘हेपॅटोब्लास्टोमा’ या दुर्मिळ आणि आक्रमक यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपीसह विविध उपचार सुरू करण्यात आले; मात्र ट्युमरच्या जागेमुळे किरकोळ शस्त्रक्रिया शक्य नव्हती आणि यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय उरला होता.
आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी ज्योती यांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःच्या यकृताचा सुमारे २५० ग्रॅम वजनाचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १० तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रियांशला नवे आयुष्य मिळाले. स्वतः उपचारातून सावरत ज्योती आजही मुलाची आणि कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत.
वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले, की भारतामध्ये एंड-स्टेज लिव्हर डिसीजने ग्रस्त मुलांसाठी ‘लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट’ हे जीवनदान ठरत आहे. विशेष म्हणजे, या प्रत्यारोपणांमध्ये आईंचा मोठा सहभाग दिसून येतो. आमच्या रुग्णालयातील जवळपास ७० टक्के बाल यकृत प्रत्यारोपण हे त्या मुलांच्या आईंनी यकृतदान करून शक्य केले आहेत.
वैद्यकीय उपचारांना माणुसकीची दिशा
प्रत्येक प्रत्यारोपण हे केवळ वैद्यकीय यश नसून त्यामागे एक जगण्याची आशा, त्याग आणि माणुसकीची उदाहरणे पाहायला मिळतात. मातृदिनानिमित्त अशा मातांचा सन्मान करण्यात येत आहे, ज्यांनी केवळ आपल्या बाळाचे संगोपनच नाही तर स्वतःचे अवयवदान करून आपल्या मुलांना नवे आयुष्य दिले. त्यांच्या प्रेमाने आणि त्यागाने वैद्यकीय उपचारांनाही माणुसकीची एक नवी दिशा मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.