उल्हासनगरात पुन्हा टँकरराज

उल्हासनगरात पुन्हा टँकरराज
Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १० : कोट्यवधी रुपयांच्या जलवाहिन्या, वाढीव पाणीपुरवठा योजना आणि नुकतीच करण्यात आलेली पाणी दरवाढ; तरीही उल्हासनगरकरांच्या नळांना कोरडेपणाचाच शाप कायम असल्याचे चित्र आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिकेलाच आता नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुन्हा टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना महापालिकेने टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २६ लाख ३१ हजार रुपयांची निविदा जाहीर केली आहे. या अंतर्गत नागरिकांना ७५० रुपयांत सात हजार लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उल्हासनगर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. एमआयडीसीकडून शहराला दररोज सुमारे १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी येणे, जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणावर गळती होणे, दूषित पाणीपुरवठा तसेच पाणी चोरीच्या तक्रारी कायम आहेत.

शहरात ‘निळी रेषा’ आणि वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र, या कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांच्या नळांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. जलवाहिनी फुटणे, पाणीपुरवठा खंडित होणे किंवा दूषित पाणीपुरवठा होणे अशा परिस्थितीत संबंधित भागातील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधल्यास त्यांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टँकरमॅफियांची भीती
 या निर्णयामुळे नव्या वादालाही तोंड फुटले आहे. टंचाईग्रस्त भागांऐवजी काही टँकर चालक श्रीमंत वस्त्यांमध्ये अधिक दराने पाणी विक्री करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे टँकर वितरण प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवणे आणि गरजू नागरिकांपर्यंतच पाणी पोहोचवणे, हे महापालिकेसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com