

सुप्रसिद्ध गायक, संगीतकार गोविंद पोवळे यांचे निधन
मुंबई, ता. १० : ‘मिलेनियम साँग्जमध्ये समाविष्ट झालेले ‘माती सांगे कुंभाराला’, प्रभाकर नागवेकर यांच्याबरोबर गायलेले ‘रात्र काळी घागर काळी’, सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘काम धाम संसार विसरली’, जानकी अय्यर यांच्या आवाजातील ‘उमटली रामाची पाउले’, माणिक वर्मा यांच्या आवाजातील ‘शुभंकरोती कल्याणम्’ यांसारख्या अनेक रसिकमान्य गीतांनी आपला अमिट ठसा उमटवणारे सुप्रसिद्ध गायक व संगीतकार गोविंद पोवळे यांचे शनिवारी (ता. ९) मध्यरात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सुयोग, सूरदास ही दोन मुले आहेत.
गोविंद पोवळे यांचे शालेय शिक्षण पनवेलजवळील चिरनेर येथे झाले. त्यांचे वडील त्रिंबक लक्ष्मण पोवळे हे कीर्तनकार होते. त्यांचे थोरले बंधू गोपीनाथ पोवळे हे रेडिओवर गात होते. ३० मार्च १९४८ रोजी गोविंद पोवळे यांचा रेडिओवर पहिला कार्यक्रम झाला. तेव्हापासून रेडिओवर सर्वात लहान कलाकार म्हणून ते प्रसिद्ध झाले. उस्ताद अल्लारखाँसाहेब त्या वेळी तिथे होते. ‘आईये छोटा आर्टिस्ट’ असे ते त्यांना नेहमी म्हणायचे. वयाच्या १५व्या वर्षांपासून ते वयाच्या सत्तरीपर्यंत ते आकाशवाणीवर गात होते. सतराव्या वर्षी त्यांनी एचएमव्ही कंपनीसाठी गायन केले. त्यांनी गिरगाव, दादर, पार्ले, अंधेरी येथे सुगम संगीताचे क्लासेस सुरू केले. दरम्यान, ‘महाराष्ट्र सुगम गीत समिती स्थापन करून सुगम संगीताचा अभ्यासक्रम व परीक्षा गोविंद पोवळे यांनी सुरू केल्या. हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुगम संगीत शिकले आहेत. त्यांचे हे योगदान विसरता येण्याजोगे नाही. त्यांच्या जाण्याने मराठी सुगम संगीत क्षेत्रातील शेवटचा तारा निखळला आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.