

घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी
मेट्रो प्रकल्पाचे गर्डर बसविण्यास उशीर झाल्याने नागरिकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे रविवारी सकाळी ठाणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गर्डर उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने भाईंदरपाडा, कासारवडवली, वाघबीळ, पातलीपाडा, ब्रह्मांड परिसरासह अनेक अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले.
घोडबंदर येथील मानपाडा परिसरात मेट्रो मार्गिकेच्या स्थानकाजवळ पादचारी पुलाचे काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) रविवारी पहाटे गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र तांत्रिक अडचणी आणि कामातील विलंबामुळे हे काम सकाळी ८ वाजेपर्यंत सुरूच राहिले. यामुळे मानपाडा परिसरातील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. त्याचा परिणाम संपूर्ण घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवर झाला. घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर भाईंदरपाडा ते ब्रह्मांड सिग्नलपर्यंत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांना ब्रह्मांड सिग्नलवरून अंतर्गत मार्गाने वळविण्यात आले; मात्र त्या रस्त्यांवरही वाहनांचा ताण वाढल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली.
----
भाईंदरपाडा ते आर मॉलपर्यंत वाहनांच्या रांगा
दुसरीकडे, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आर मॉलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुट्टी असतानाही सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर पडले होते. काहींना रेल्वे स्थानक गाठण्यासाठीही मोठा विलंब सहन करावा लागला. गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र सकाळी उशिरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.