जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ‘फिल्डिंग’

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ‘फिल्डिंग’
Published on

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे गटाची ‘फिल्डिंग’

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मैदानात; दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने संघटनबांधणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काबीज करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यांचा तब्बल दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा जाहीर करण्यात आला आहे. १६ मे ते १५ जुलैदरम्यान राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत; मात्र या दौऱ्याकडे केवळ संघटनात्मक उपक्रम म्हणून नव्हे, तर महायुतीतील भविष्यातील राजकीय ताकद मोजण्याच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या दौऱ्याची माहिती दिली. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई-ठाण्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत प्राथमिक संवाद दौरे केले होते. आता त्याच मोहिमेचा विस्तार राज्यभर केला जात आहे.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने बूथस्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागात स्वतःची पकड अधिक मजबूत करण्यासाठी या दौऱ्यात बूथप्रमुख, बीएलए नियुक्त्या, स्थानिक पातळीवरील नाराजी, संघटनात्मक गटबाजी आणि निवडणूक व्यवस्थापन यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपला ‘आव्हान’
महायुतीत सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि नेतृत्वावरून सुप्त संघर्ष कायम असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत राज्यभरातील दौऱ्याद्वारे शिवसेना आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागात भाजपची वाढती ताकद लक्षात घेता, शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

तीन टप्प्यांत दौरा
या दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. जूनमध्ये जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत बैठका होतील. तर जुलैमध्ये बुलडाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा पार पडणार आहे.

२०२४च्या ‘मॉडेल’ची पुनरावृत्ती
२०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीने दौरे केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून स्थानिक मुद्दे जाणून घेण्यावर भर देण्यात आला होता. आता त्याच मॉडेलची पुनरावृत्ती होत असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com