

मुंबई-गोवा मार्गावर वाहनांच्या १० किलोमीटरपर्यंत रांगा
खेड/माणगाव, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागला. रायगडमधील इंदापूर, माणगाव आणि कोलाड परिसरात तसेच रत्नागिरीतील संगमेश्वर, सावर्डे ते बावनदी टप्प्यात महामार्गाचे काम अर्धवट असल्याने तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक आणि चाकरमानी कोकणाकडे रवाना होत आहेत; मात्र खाब-कोलाड ते इंदापूरपर्यंत गेल्या नऊ दिवसांपासून वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे. एसटी बस, खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी आणि मालवाहू वाहनांमुळे महामार्गावर मोठी गर्दी होत आहे.
महामार्गाचे काम गेल्या ११ वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या संथ कामामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. आता ३१ ऑक्टोबरची नवीन मुदत देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष कामाच्या गतीवरून हे काम वेळेत पूर्ण होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.