

उन्हाच्या कडाक्यात नवी मुंबई अंधारात
तुर्भे, वाशीसह दिघ्यात विजेचा लपंडाव; महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबईत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना रविवारी (ता. ११) मध्यरात्री वाशी, बोनकोडे, कोपरखैरणे तसेच तुर्भे परिसरातील काही भागांमध्ये वीज तासनतास गायब झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, दिघा परिसरातही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून, महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वाशी, बोनकोडे, कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरासह काही भागांमध्ये रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास वीज गेली आणि पहाटे चार वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. घरामध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी पाण्याच्या मोटारी बंद राहिल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून वीजपुरवठा खंडित होण्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नसून, तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नागरिकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तक्रार नोंदवण्यासाठी केलेले फोन उचलले गेले नाहीत. काही नागरिकांनी ऑनलाइन तक्रार प्रणालीवरही तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दिघा विभागात विजेचा खेळखंडोबा
वाशी (बातमीदार) ः दिघा विभागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनुप विजय आचरेकर यांनी महावितरणच्या ऐरोली विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दिघा विभागातील वाढत्या लोकसंख्येनुसार विजेची मागणी वाढली आहे. यानुसार दिघ्यासाठी कर्मचारी संख्या वाढवावी आणि वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.