

राज्यातील सर्वात मोठे ‘डायलिसिस सेंटर’ नवी मुंबईत
५० बेड्सची सुविधा आता एकाच छताखाली
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई पालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाशी सेक्टर १४ येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठे ५० बेड्स क्षमतेचे स्पेशल डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नुकतीच या केंद्राची पाहणी करून येथील सुविधांचा आढावा घेतला.
शरीरातील मूत्रपिंडांची अर्थात किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर डायलिसिस करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्वसाधारणपणे एक वेळेच्या डायलिसिसला तीन ते साडेतीन हजारांएवढा खर्च येतो व आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागले तर सामान्य रुग्णाला हा खर्च परवडत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई पालिकेने वाशी सेक्टर १४ येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतीत ५० बेड्स क्षमतेचे विशेष डायलिसिस केंद्र सुरू केले आहे. या केंद्राची कैलास शिंदे यांनी पाहणी करीत अधिकाधिक गरजूंना लाभ व्हावा, यादृष्टीने या केंद्राची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
गंभीर आजारांचे मोफत निदान
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कार्यक्रमातील एनसीडी अभियानांतर्गत हे ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देत कैलास शिंदे यांनी या तपासणीद्वारे प्राधान्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान करणे, त्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आल्याचे सांगितले.
८५ बेडची सुविधा उपलब्ध
सध्या मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे दिसत असून त्यादृष्टीने डायलिसिसची गरज वाढत आहे, हे लक्षात घेऊन पालिकेने या विशेष केंद्रासह पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात १०, नेरूळ रुग्णालयात ११, ऐरोली रुग्णालयात ११ तसेच सेक्टर आठ सीबीडी बेलापूर येथील सेंटरमध्ये तीन अशाप्रकारे एकूण ८५ बेड्स डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.