साकिनाका येथील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक

साकिनाका येथील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक
Published on

साकीनाका येथील सेक्स रॅकेटप्रकरणी महिलेस अटक
सुटका केलेल्या दोन महिलांची सुधारगृहात रवानगी

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः साकीनाका येथील एका सेक्स रॅकेटप्रकरणी आरती ऊर्फ उपासना नावाच्या एका महिलेस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून या दोघींनाही नंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घाटकोपर येथे राहणारी आरती ही महिला ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा केली होती. या बोगस ग्राहकाने तिला कॉल करून तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह तरुणींची मागणी केली होती. तिने दोन तरुणींना घेऊन येत असल्याचे सांगून प्रत्येक तरुणीमागे आठ हजार रुपये मोबदल्याची मागणी केली होती. फोनवरून सर्व व्यवहार झाल्यानंतर तिने त्याला अंधेरीतील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.
ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक तिथे गेला होता. काही वेळानंतर तिथे उपासना ऊर्फ आरती ही दोन तरुणींसोबत आली होती. या वेळी त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरू होता. याचदरम्यान पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्यासह तिच्यासोबत आलेल्या दोन्ही तरुणींची चौकशी केल्यांनतर आरती ही सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तसेच तिच्याच सांगण्यावरून त्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी तिथे आल्याचे सांगितले.
..........................................

डॉक्टरला ६५ लाखांना गंडा घालणाऱ्या आरोपीस अटक
स्वस्तात फ्लॅटच्या प्रलोभनातून फसवणूक केल्याचा आरोप

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः मालाड येथे राहणाऱ्या एका डॉक्टरला ६५ लाखांना गंडा घातल्‍याप्रकरणी ब्रिजेश गिरीजाशंकर यादव ऊर्फ पिंटू यादव या आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात संतोष यादव ऊर्फ साहिल घाने हा पाहिजे आरोपी असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
स्वस्तात फ्लॅटच्या प्रलोभनाने या दोघांनी डॉक्टरची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ब्रिजेश यादवला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार मालाड येथे राहत असून व्यवसायाने डॉक्टर आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची ब्रिजेश आणि संतोषशी ओळख झाली होती. त्यांची तिथे एक खासगी संस्था असून या संस्थेत ते दोघेही प्रमुख पदाधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या संस्थेने अनेकांना स्वस्तात फ्लॅट दिले आहे, त्यामुळे त्यांना फ्लॅटची गरज असल्यास त्यांना फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी त्यांना मालाड येथील एका पॉश अपार्टमेंटमध्ये थ्री बीएचके फ्लॅट असल्याचे सांगून त्यांना तो फ्लॅट स्वस्तात देण्याचे प्रलोभन दाखविले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून ऑनलाइन आणि कॅश स्वरूपात टप्प्याटप्प्याने ६५ लाख रुपये घेतले होते. काही दिवसांत रजिस्ट्रेशन करू, असे सांगून त्यांनी त्यांच्यासोबत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते.
......................................

रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या दुकलीस अटक
तेरा गुन्ह्यांची नोंद; चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या एका दुकलीस डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. रशीद मोहम्मद रफिक शेख आणि सैद अहमद मस्तान शेख ऊर्फ अली अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध घरफोडीचे १३हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने चार घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तक्रारदार व्यापारी असून त्यांचा अंधेरी परिसरात एक शॉप आहे. २५ एप्रिलला रात्री उशिरा त्यांच्या शॉपमध्ये चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने ड्राव्हरमधील कॅश चोरी करून पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप काळे, पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलिस हवालदार रोहन बंगाळे, ऋषिकेश बाबर, प्रसाद वरे, सुमीत पोळ, अनिकेत वाकोडे, संग्राम पात्रे आदी पोलिस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून या पथकाने नालासोपारा येथील पेल्हार परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून रशीद शेख आणि सैद शेख या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत ते दोघेही नालासोपारा येथील पेल्हार, जब्बारपाड्यातील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. नोकरी करून जास्त पैसे मिळत नसल्याने ते दोघेही दिवसा रेकी केल्यानंतर रात्रीच्या वेळेस घरफोडी करीत होते. या दोघांविरुद्ध गोवंडी, चेंबूर, ट्रॉम्बे माटुंगा, पंतनगर, दादर, एमआरए, टिळकनगर, भायखळा आणि एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात १३हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांनी अलीकडेच डी.एन.नगर हद्दीत दोन तर भोईवाडा आणि एल.टी. मार्ग पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com