

फुटबॉल स्टेडियमसमोरील रस्त्यावर धोकादायक गटार
खारघर, ता. ११ (बातमीदार) : येथील फुटबॉल स्टेडियमसमोरील सर्व्हिस रोडवर गेल्या काही महिन्यांपासून तीन गटारे झाकणांशिवाय उघडी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गाचा वापर सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रहिवासी, मुले आणि ज्येष्ठ नागरिक करीत असतात. उघड्या गटारांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपालिकेने संबंधित गटारांवर झाकण बसवून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली आहे. दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी दुर्दैवी घटना घडू शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.