

खासगी क्लासशिवाय जुळ्या बहिणींची दहावीत चमक
शाळेतील अभ्यास, नियमित सरावाच्या जोरावर नेहा-भूमी कदम यांचे यश
जोगेश्वरी, ता. ११ (बातमीदार) ः दहावीच्या निकालात जोगेश्वरीतील डोसीबाई जीजीभॉय हायस्कूलच्या दोन जुळ्या बहिणींनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नेहा दिनेश कदम हिने ९६.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर भूमी दिनेश कदम हिने ९६.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
विशेष म्हणजे, या दोघींनी कोणताही खासगी क्लास न लावता केवळ शाळेतील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि घरी नियमित अभ्यास यांच्या जोरावर हे यश मिळविले. शाळेत शिक्षक शिकवत असताना पूर्ण लक्ष द्यायचे आणि रोज घरी नियमित अभ्यास करायचा, हा त्यांचा यशाचा मंत्र ठरला.
दहावीच्या परीक्षेपूर्वी त्यांनी १० ते १५ सराव परीक्षा पेपर सोडवून तयारी अधिक भक्कम केली. अभ्यासात सातत्य, योग्य नियोजन आणि एकमेकींसोबत बसून केलेला अभ्यास यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक पालक मोठ्या फी भरून मुलांना खासगी क्लासला पाठवितात. मात्र, नेहा आणि भूमी यांनी शाळेतील शिक्षणावर विश्वास ठेवत मेहनतीच्या जोरावर यश मिळवून दाखविले. त्यामुळे नवीन पिढीसमोर तसेच पालकांसमोर त्यांनी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.