नवी मुंबई मनपातील उद्यान, जुने गटार आणि कचरा कुंडीच्या कामात अनियमितता

नवी मुंबई मनपातील उद्यान, जुने गटार आणि कचरा कुंडीच्या कामात अनियमितता
Published on

‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांचे चौकशीचे आदेश
दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या बेलापूर विभागातील विकासकामांमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची दखल घेत, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधान भवनात झालेल्या बैठकीत, दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून पैशांची वसुली करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ही बैठक विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. सीवूड्स सेक्टर ५० मधील जुने गटार कामात अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. या स्थळाची पाहणी केली असता हा रस्ता एका बाजूला उताराचा असून, येथे गटार व फुटपाथ होते. तरीही रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गरज नसताना चुकीच्या पद्धतीने गटार निर्माण करण्यात आले. या कामात किती खर्च आला याची माहिती उपलब्ध झालेली नाही. याशिवाय महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये टाकण्यात आलेल्या मातीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी भरण्यात आली याची माहिती उपलब्ध नाही. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून एकूण ३३० कचराकुंड्या बसवण्याचे प्रस्तावित होते. प्रत्यक्षात मात्र २८७ कचराकुंड्या बसवल्या असून, उर्वरित ४३ कचराकुंड्यांचे काय झाले, हे निदर्शनास आलेले नाही.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
भरत जाधव यांनी सांगितले की, याबाबतचा अहवाल पालिका प्रशासनाकडे चौकशी अधिकारी सुनील पवार यांनी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केला होता. मात्र, सहा महिने उलटूनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. याउलट यातील काही दोषी अधिकारी यांच्यावर प्रशासन मेहेरबान का आहे, असा सवाल जाधव यांनी या वेळी उपस्थित केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com