विक्रमगडमध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी

विक्रमगडमध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी
Published on

विक्रमगडमध्ये खरीप हंगामाची जोरदार तयारी

विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : यंदाचा खरीप हंगाम उत्पादनवाढीचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरावा, यासाठी विक्रमगड तालुका कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या सूचनेनुसार खत, बियाणे, कीटकनाशके आणि कृषी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

तालुक्यातील भातप्रधान शेती लक्षात घेता, यंदा सुमारे नऊ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावर भातलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ३१२ टन प्रमाणित भात बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. भातासोबत नागली, वरई, कडधान्ये आणि गळीत धान्य पिकांसाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाचा विचार करून कमी पाण्यात येणाऱ्या पिकांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.

खरीप हंगामात खतांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने आगाऊ उपाययोजना केल्या आहेत. तालुक्यात यंदा दोन हजार ७०८ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार असून त्यामध्ये दोन हजार २५० मेट्रिक टन युरियाचा समावेश आहे. याशिवाय डीएपी, एमओपी, एसएसपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरेसा साठाही ठेवण्यात आला आहे. सेंद्रिय खतांच्या वापरालाही प्रोत्साहन दिले जात असून स्थानिक कृषी सेवा केंद्रे, सोसायट्या आणि परवानाधारक विक्रेत्यांमार्फत खत वितरण केले जाणार आहे.
-----------------
‘महाविस्तार’मध्ये नोंदणीचे आवाहन

तालुका कृषी अधिकारी जगदीश दोदे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि कीटकनाशके वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी गावपातळीपर्यंत नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना भात व इतर बियाण्यांसाठी तत्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक सोसायटी किंवा कृषी केंद्राकडे खतांची आगाऊ मागणी नोंदवावी, २० मेपूर्वी नांगरट, बांध दुरुस्ती व शेणखत टाकण्याची कामे पूर्ण करावीत, असेही सांगण्यात आले आहे. हवामान अंदाज आणि बाजारभाव मोबाईलवर मिळण्यासाठी ‘महाविस्तार एआय’ योजनेत नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------

खरीप हंगाम समाधानकारक
मॉन्सूनपूर्व काळात शेततळे दुरुस्ती, पाणंद रस्ते, जलसंधारण आणि सिंचनाशी संबंधित कामांनाही वेग देण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि शेतकरी दोघेही तयारीत व्यस्त आहेत. मलवाडा येथील शेतकरी कमलाकर भोईर यांनी सांगितले, की दरवर्षी बियाणे आणि खतांसाठी धावपळ करावी लागते; मात्र यंदा आधीच नियोजन झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत केलेले नियोजन, खत-बियाण्यांचा पुरेसा साठा आणि कृषी विभागाची सज्जता यामुळे यंदाचा खरीप हंगाम विक्रमगड तालुक्यासाठी समाधानकारक ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com