‘दहिसर नदी पुनरुज्जीवनाचा केवळ दिखावा’

‘दहिसर नदी पुनरुज्जीवनाचा केवळ दिखावा’
Published on

‘दहिसर नदी पुनरुज्जीवनाचा केवळ दिखावा’
कामाच्या संथ गतीवर पर्यावरणप्रेमींची टीका
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका होत असतानाच, आता वर्षानुवर्षे रखडलेल्या दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ५.० एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लांटचे उद्‌घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले खरे, परंतु प्रत्यक्षात नदीची अवस्था आणि प्रकल्पाची संथ गती पाहता दहिसरकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
​केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालेल्या या उद्‌घाटन सोहळ्यासाठी पालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी मोठी गर्दी जमवली होती. मात्र, केवळ ५.० एमएलडी क्षमतेचा प्लांट संपूर्ण दहिसर नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी पुरेसा आहे का, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायलाच इतकी वर्षे लागली, तर संपूर्ण प्रकल्प कधी पूर्ण होणार, याचे उत्तर कोणाकडेही नाही.
​ अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केवळ पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, ज्याचा खर्च मूळ अंदाजपत्रकापेक्षा कित्येक पटीने वाढला आहे. नदीच्या पात्रात आजही कचरा आणि रसायने मिसळली जात आहेत, ज्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवूनच हा उद्घाटनाचा घाट घातला गेल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे.

कामात पादर्शकता, वेग हवा
एकीकडे मुंबईतील रस्ते आणि खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असताना, दुसरीकडे अशा सौंदर्यीकरण प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासन काय साध्य करणार आहे. केवळ उद्‌घाटनाचे सोहळे साजरे करण्यापेक्षा कामात पारदर्शकता आणि वेग आणण्याची गरज असल्याची भावना वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केली.

रंगरंगोटी म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे!
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले असले तरी, पावसाळ्यात दहिसर नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान हा प्रकल्प थांबवू शकणार का, याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून मिळालेले नाही.​ नदीचे सौंदर्यीकरण करण्यापेक्षा आधी नदीतील गाळ उपसणे आणि पात्र मोकळे करणे गरजेचे आहे. केवळ लायटिंग आणि रंगरंगोटी म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे. असे पर्यावरण कार्यकर्ते डी. स्टॅलिन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com