आंबा महोत्सवात दोन कोटींची उलाढाल

आंबा महोत्सवात दोन कोटींची उलाढाल
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाण्यातील गावदेवी मैदानात पार पडलेल्या १९व्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा दिवसांत तब्बल ३५ ते ४० हजार डझन आंब्यांची विक्री झाली आहे. या विक्रीतून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक आणि आमदार संजय केळकर यांनी दिली.
संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील गावदेवी मैदान येथे १ ते १० मेदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात ठाण्यासह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेट देत खरेदी केली. महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना आणि केसर आंब्यांसह आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, लोणचे, पापड आणि पोहे आदी उत्पादनांचे सुमारे ४५ स्टॉल उभारण्यात आले होते. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून वाजवी दरात आंबे खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले. महोत्सवादरम्यान खरेदीदारांसाठी लकी कुपन योजना राबविण्यात आली होती. तसेच विजेत्यांना घरपोच आंबे देण्यात येणार आहेत. याशिवाय सायली विनेरकर, मुकेश आणि पूजा होल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिक हिलिंग शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शेतकरी, स्टॉलधारकांची भेट
शेवटच्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी महोत्सवात आंबा शेतकरी आणि स्टॉलधारकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या विक्रीबाबत समाधान व्यक्त करत केळकर यांचे आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना, प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदा कोकणात केवळ १५ टक्के आंबा उत्पादन झाले. तरीही महोत्सवात शेतकऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्या दहा दिवसांत सुमारे ३५ ते ४० हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com