

महापालिकेच्या छतावरील सौरऊर्जेतून १२३ कोटींची होईल बचत
शिक्षण समिती सदस्य निखिल व्यास यांनी मांडला बैठकीत मुद्दा
मुंबई, ता. १२ : मुंबई महापालिकेच्या असलेल्या सर्व शाळांच्या इमारतींच्या छतांवर सौरऊर्जेचे प्रकल्प राबवावेत, अशी मागणी महापालिकेच्या शिक्षण समितीचे स्वीकृती सदस्य निखिल व्यास यांनी सोमवारी (ता. ११) शिक्षण समितीच्या बैठकीत हरतीकतीच्या मुद्द्याद्वारे केली.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५०० शाळांमध्ये ३० किलोवॉट क्षमतेच्या सौर यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांची वीज बचत, कार्बन क्रेडिटद्वारे अतिरिक्त महसूल तसेच एआय आणि स्पेस प्रयोगशाळांसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो ही बाबही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
मुंबई महापालिकेच्या असलेल्या सर्व शाळांच्या इमारतींचे एकत्रित क्षेत्रफळ सुमारे १.२ कोटी चौरस फूट आहे. या जागेवर सौरऊर्जेची यंत्रणा बसविल्यास यातून शून्य सरकारी खर्चात वार्षिक ५८ ते १०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल आणि विजेच्या बचतीतून महापालिकेला वार्षिक १२३.६ कोटी रूपयांचे लाभही मिळतील, यामुळे सर्व शाळांच्या छतांचा वापर सौरऊर्जेसाठी करून सूर्यशक्तीतून मुंबईचा विकास घडवता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक शासकीय इमारतीवर सौरऊर्जा यंत्रणा बसवणे अनिवार्य केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळांच्या छतांवर ‘प्रोजेक्ट सूर्या विद्या’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. यावर याबाबत प्रशासनाने सखोल अभ्यास करून धोरण आखावे, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षांनी दिले. शिक्षण समिती सदस्य तथा उबाठा गटाचे नगरसेवक प्रियांक राऊत यांनी दहिसर येथील नरे पार्क पालिका शाळेवरील सौरऊर्जा यंत्रणा धूळखात पडल्याची बाब निदर्शनास आणली. त्यामुळे सर्वच समिती सदस्यांच्या भुवया उंचावल्या. नवीन प्रकल्पांबरोबर विद्यमान यंत्रणांच्या देखभालीकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.