अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची केली मागणी

अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची केली मागणी
Published on

अत्रे रंगमंदिरातील गैरसोयींवर कलाकारांचा संताप
प्रयोगादरम्यान वारंवार तांत्रिक बिघाड; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिरातील गैरसोयी आणि दुरवस्थेविरोधात ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या कलाकारांनी आवाज उठवला असून, त्यांचा संताप व्यक्त करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी खंत कलाकारांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात नाटकाच्या कलाकारांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. या वेळी बोरगावकर यांनीही पालिका प्रशासनावर टीका करत अत्रे रंगमंदिराच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर हे शहरातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. येथे नियमितपणे मराठी नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. मात्र, सध्या या नाट्यगृहातील तांत्रिक अडचणी आणि सुविधांच्या अभावामुळे कलाकारांसह प्रेक्षकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी नाट्यगृहातील विजेच्या समस्या अधोरेखित केल्या आहेत. प्रयोग सुरू असताना वारंवार विजेच्या ठिणग्या पडत असल्याने अनेकदा नाटक मध्येच थांबवावे लागते, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत तांत्रिक बिघाडामुळे चार ते पाच वेळा प्रयोग थांबवावे लागल्याचा दावा त्यांनी केला. लॉकडाऊननंतर नाट्यगृह दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आले होते. मात्र त्या काळात नेमकी कोणती कामे झाली आणि खर्च केलेला निधी कुठे गेला, असा सवालही श्रद्धा हांडे यांनी उपस्थित केला.

शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी हा कलाकारांचा माध्यमातून व्यक्त झालेल्या त्रासाचा उद्रेक असल्याचे सांगितले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे ही भूमिका घ्यावी लागल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच याप्रकरणी पालिका प्रशासनाला पत्र देण्यात येणार असून, सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

वाढत्या उष्णतेमुळे आणि विजेवरील अतिरिक्त भारामुळे काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले. जनरेटर सुरू होण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागत असल्याने प्रयोगात व्यत्यय आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नाट्यगृह परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रेक्षकांनी अन्नपदार्थ टाकू नयेत, असे आवाहन वारंवार करण्यात येत असून, नियमांचे पालन न झाल्याने उंदीर आणि इतर समस्या निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
- माणिक शिंदे, अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com