

सदावर्ते जरा जपून फिरा!
मनसे नेते राजू पाटील यांचा इशारा, भाजपलाही टोला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एकेरी भाषेत उल्लेख करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी जोरदार टीका करत सल्लावजा इशारा दिला आहे. रविवारी (ता. १०) डोंबिवलीतील मनसे कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात मनसेच्या ‘राजगड’ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मनसे शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, संदीप पाचंगे, धनंजय गुरव, राहुल कामत, अरुण जांभळे, योगेश पाटील, विनायक मुंडे आणि प्रणव केणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘कोण काय बोलतंय, यापेक्षा त्यांची लायकी काय आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नको. त्यामुळे अशा माणसाविषयी बोलायची आमची अजिबात इच्छा नाही,’ असे राजू पाटील म्हणाले. या वेळी त्यांनी ॲड. सदावर्ते यांना थेट इशारा देत, ‘फिरताना जरा जपून फिरा. कोणीही येईल आणि तुमच्यावर हल्ला करेल आणि त्यानंतर तुम्ही आमच्या मनसेचं नाव घ्याल,’ असे वक्तव्य केले. राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या भागातील मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी मागील महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच परिसरात मनसेने नव्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करून पुन्हा संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ॲड. सदावर्ते यांच्यावर केलेली टीका आणि भाजपवर लगावलेले टोले यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
भाजपवर निशाणा
डोंबिवलीत पार पडलेल्या ‘आन ठाकूर मान ठाकूर शौर्यगाथा’ कार्यक्रमावरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘डोंबिवलीतील आमदारांना आता आगरी समाजाची आठवण आली, ही आनंदाची गोष्ट आहे; मात्र प्रत्येक समाजाची दखल घेऊन काम केलं तर अधिक चांगलं राहील,’ असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला आपण जाणार होतो; मात्र कार्यक्रमस्थळी सर्वत्र भाजपचे कमळ चिन्ह दिसत असल्याने तो एका पक्षाचा कार्यक्रम वाटला आणि आपण जाणे टाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी कार्यक्रमाला जाणार होतो; पण तिथे सर्व कमळची चिन्हं लावलेली दिसली. त्यामुळे मी जाणं टाळलं,’ असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.