

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणातून शहरातील भीषण वास्तव समोर आले आहे. यंदा ठाणे शहरात तब्बल चार हजार ४३७ इमारती धोकादायक अवस्थेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात २०२५-२६ मध्ये चार हजार २९६ इमारती धोकादायक होत्या. ८५ पैकी २५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या वाढल्याने सुमारे साडेतीन लाख नागरिकांचे जीव वाचविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये अतिधोकादायक, धोकादायक तसेच दुरुस्तीयोग्य इमारतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार ९३ इमारती अतिधोकादायक (सी१) श्रेणीत असून, त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे, तर १९५ इमारती धोकादायक (सी२ए) श्रेणीत आहेत. याशिवाय दोन हजार ५८१ इमारती सी२बी म्हणजे मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या प्रकारात आणि एक हजार ५६८ इमारती सी३ म्हणजे किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या प्रकारात मोडतात.
मुंब्रा परिसर अव्वल
सर्वाधिक धोकादायक इमारती या मुंब्रा परिसरात असून, येथे तब्बल एक हजार ३६२ इमारती धोकादायक आढळल्या असून, नऊ हजार १०३ वाणिज्य गाळ्यांची स्थितीही चिंताजनक आहे. या परिसरातील ४६ हजार ६३० कुटुंबांतील सुमारे एक लाख ८९ हजार ७६५ नागरिक धोकादायक इमारतींमध्ये राहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्या खालोखाल दिवा परिसरातही ५५२ इमारती धोकादायक असल्याचे आढळले असून, २३ हजार १५८ कुटुंबांतील ९२ हजार ६३२ नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत.
साडेतीन लाख रहिवाशांचा जीव धोक्यात
धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ८९ हजार ८३५ कुटुंबांचे वास्तव्य असून, कुटुंबांतील सुमारे तीन लाख ४९ हजार २१९ नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. याशिवाय शहरातील १० हजार ८७० वाणिज्य गाळेदेखील धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे.
इमारतींना नोटिसा
महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच C२B आणि सी३ प्रकारातील इमारतींच्या मालकांना तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यावर भर देण्यात येत असून, दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- गजानन गोदेपुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका
प्रभागनिहाय परिस्थिती
प्रभाग धोकादायक इमारती
मुंब्रा १,३६२
दिवा ५५२
वागळे १,१०२
नौपाडा-कोपरी ४३८
कळवा २८६
लोकमान्यनगर २५७
माजिवडा १९३
उथळसर १७८
वर्तकनगर ६९
धोकादायक इमारती
२०२५-२६ ४,२९६
२०२६-२७ ४,४३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.