

‘तिसरी मुंबई’ प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
एमएमआरडीएविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पनवेल, ता. १२ (वार्ताहर) : पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात एमएमआरडीएमार्फत प्रस्तावित असलेल्या नवनगर अर्थात तिसरी मुंबई हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पामध्ये कायद्यांचे उल्लंघन, पुनर्वसनातील त्रुटी आणि प्रशासकीय गैरव्यवहार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी केला असून, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत तक्रार केली आहे.
रमाकांत पाटील यांच्या मते, हा प्रकल्प राबविताना भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा २०१३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि एमआरटीपी कायद्यातील सक्तीच्या तरतुदींचे पालन केलेले नाही. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जनसुनावणी, सामाजिक परिणाम मूल्यांकन आणि पर्यावरणीय मंजुरीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मिठागर जमिनींचा समावेश आहे. मिठागरे ही पुरापासून संरक्षण करणारी नैसर्गिक भिंत मानली जातात. त्यामुळे येथे बांधकाम झाल्यास भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मँग्रोव्ह आणि जलस्रोत नष्ट होऊन जैवविविधतेचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी, मच्छीमार, मिठागर कामगार, आदिवासी आणि १२ बलुतेदार यांच्यासाठी कोणतेही सर्वसमावेशक पुनर्वसन धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. या संपूर्ण प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयामार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी. प्रकल्पास तत्काळ स्थगिती देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पुन्हा राबवाव्यात. सर्व बाधित घटकांसाठी कायद्यानुसार योग्य मोबदला आणि पुनर्वसन निश्चित करावे, अशा मागण्या रमाकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.