

रोह्यात रंगला बैलगाडी शर्यतींचा थरार
किशोर सावंत यांच्या गाडीने मारली बाजी
रोहा, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यातील देवकान्हे येथे आयोजित जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत तळवली येथील किशोर सावंत यांच्या बैलगाडीने अंतिम फेरीत विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायत देवकान्हे आणि प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शर्यतींनी रोहा तालुक्यात मोठा उत्साह निर्माण केला होता.
धानकान्हे माती बंदरावर रंगलेल्या या स्पर्धेत शंभरहून अधिक बैलगाड्या आणि मालक सहभागी झाले होते. शर्यतीच्या विविध फेऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. यातील अंतिम फेरीत किशोर सावंत यांनी बाजी मारली. तर, उपांत्य फेरीत गणेश ठाकूर (बिरवाडी) आणि क्वार्टर फायनलमध्ये मोहिद्दीन कडू यांची बैलगाडी प्रथम धावली. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्रे आणि मान्यवरांच्या हस्ते रोख, पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, रवींद्र मरवडे, डॉ. श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे आदी उपस्थित होते.