

एमआयडीसीत गतिरोधक नसल्याने अपघात
वाशी ता १२ (बातमीदार)ः एमआयडीसी परिसरातील मुख्य रस्त्यावर अल्फा लेव्हल बसस्टॉपजवळ गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनांचा वेग वाढत असून, वारंवार अपघात घडत आहेत. शनिवारी येथे एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाला असून, त्याच्यावर वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरातील कामगार, सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
एमआयडीसी परिसर हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत वर्दळीचा भाग असून, येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, कंटेनर, ट्रक तसेच कर्मचारी वाहतूक करणाऱ्या बसेसची सतत ये-जा सुरू असते. विविध कंपन्यांकडे जाण्यासाठी रस्त्यावर अनेक ठिकाणी यू-टर्नची व्यवस्था करण्यात आली आहे. अल्फा लेव्हल परिसरातही कर्मचाऱ्यांसाठी बसस्टॉप उभारण्यात आला असून, रोज हजारो कामगार येथे उतरून रस्ता ओलांडतात. याच ठिकाणी वाहनांना यू-टर्न घेण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आल्याने वाहतुकीचा ताण अधिक वाढतो. मात्र, या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने वाहनचालक बेदरकारपणे गाड्या चालवत आहे. रस्ता रुंद आणि मोकळा असल्याने अनेक वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नाहीत. परिणामी रस्ता ओलांडणारे कामगार, महिला आणि नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. परिसरातील सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात आठवड्याला दोन ते तीन लहान-मोठे अपघात होत आहेत.
शनिवारी घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाने धडक दिली. तातडीने या जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कामगारांनी तातडीने या ठिकाणी गतिरोधक उभारणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावणे, झेब्रा क्रॉसिंग करणे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.