

एकाच महासभेत ४६३ विषय!
बदलापूरच्या तिजोरीवर सुशोभीकरणाचा भार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे/बदलापूर, ता. १२ : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ४६३ विषयांची जम्बो महासभा २० मे रोजी होणार आहे. तब्बल १८५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव या वेळी मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये शहराच्या प्रश्नांपेक्षा सजावटीचेच सर्वाधिक प्रस्ताव असून, तब्बल ४० कोटी रुपये केवळ सुशोभीकरणाच्या कामांवर खर्च करण्याचा घाट घालण्यात आला आहे. नगर परिषदेच्या तिजोरीची अवस्था चिंताजनक असल्याने सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची निवडणूक होऊन पाच महिने झाले आहेत. आधीच्या महासभा या सत्तास्थापना, राजकीय वर्चस्व आदी मुद्द्यांनी गाजल्या; पण आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक ‘कामाला’ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासकामे तुंबल्यामुळे त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी भरभरून प्रस्ताव सादर करण्याचा सपाटा लागला आहे. त्याची प्रचीती २० मे रोजी होणाऱ्या महासभेत येणार आहे. या विशेष महासभेच्या विषयपत्रिकेत तब्बल ४६३ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यात नियमित सात प्रस्ताव असून, आस्थापनविषयक तीन प्रस्ताव आहेत. त्यानंतर ४७ प्रस्ताव हे प्रशासनाचे आहेत; मात्र या विषयांनंतर तब्बल ४०६ विषय हे सदस्यांचे आहेत. या सभेत सुमारे १८५ कोटींची विषय चर्चिले जाणार आहेत. काही धोरणात्मक विषय आहेत; मात्र शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी केली जाणार असल्याचे या विषयपत्रिकेतून स्पष्ट होत आहे.
...
कराच्या पैशांचा चुराडा
निवडणुकीपूर्वी बदलापुरात किती विकास झाला याचा पाढा भाजप आणि शिवसेना शिंदे गट वाचत होते, तर या विकासात भ्रष्टाचाराचा मुद्दाही गाजला. वास्तविक बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत चौक सुशोभीकरण, कोपरा सुशोभीकरण, कमानी उभारणे, उद्यान सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यातील अनेक चौक सुशोभीकरण केल्यानंतर रुंदीकरणात तोडण्यात आले. आता नव्याने चौक सजावट, सुशोभीकरण, रंगरंगोटी, रोड फर्निचर, पदपथ सुशोभीकरण, दुभाजक सुशोभीकरण आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. आधीच्या सुशोभीकरणाच्या कामांची स्थिती, त्याची दुरवस्था पाहता पुन्हा बदलापूरकरांच्या कराच्या पैशांचा चुराडा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
...
नावात साम्य, निधीत तफावत
महासभेच्या अजेंड्यावर असलेल्या विषयपत्रिकेमध्ये काही कामांच्या नावांत साम्य असल्याचे दिसून येत आहे. एकाच नावाचे दोन प्रस्ताव असून, निधीत मात्र तफावत आहे. याशिवाय रस्त्यांचे शंभर टक्के काँक्रीटीकरण झाल्याचा दावा केला जात असतानाही प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी १० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
...
महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी...
बदलापूर नगर परिषदेचे सुमारे एक हजार ९६२ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय बजेट असून, विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी राज्य शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरोत्थान योजना, डीपीडीसी आदी माध्यमांतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील संपूर्ण नियोजन आधीच करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. परदेशातील उच्च दर्जाच्या शहरांप्रमाणे दर्जेदार आणि सुबक रस्ते बदलापूरमध्ये उभे करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.