

दहावीच्या परीक्षेत महिलांची ऐतिहासिक कामगिरी
‘सेकंड चान्स’ उपक्रमातून दहावीच्या परीक्षेत ९९ टक्के यश
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका नीती आयोगाच्या ‘आकांक्षित तालुका’ कार्यक्रमांतर्गत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, येथील महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दाखवून दिली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि लार्सन ॲण्ड टुर्बो पब्लिक चेरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सेकंड चान्स’ उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांनी दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के यश संपादन करत इतिहास घडवला आहे.
या उपक्रमांतर्गत विक्रमगडमधील सहा मुख्य गावांमध्ये गावपातळीवर दररोज वर्ग घेण्यात आले. या वर्गांमधून सुमारे १२ गावांतील महिला आणि मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. विशेष म्हणजे, महिलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर अनेक वर्षे शिक्षणापासून दूर राहिलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
घरातील जबाबदाऱ्या, शेती, मजुरी आणि मुलांच्या संगोपनानंतर दुपारी २ ते ४.३० या वेळेत महिलांचे वर्ग भरत होते. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी वेळ काढत महिलांनी जिद्दीने अभ्यास केला. या प्रयत्नांचे फलित म्हणजे १२३ पैकी १२२ महिलांनी दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. यंदाच्या निकालात गुणवंत विद्यार्थिनींचीही चमक दिसून आली. चिंचघर येथील निकिता टोकरे हिने ७२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. खडकी येथील साधना टोकरे (६८.२०%), आलोंड येथील अर्चना मेढा (६७.२०%) आणि शेलपाडा येथील निलम शेळका (६५%) यांनी चांगले यश संपादन केले.
या निकालाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ५० ते ६५ वयोगटातील १३ महिला उत्तीर्ण झाल्या आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धातही शिक्षणाची आस जपत त्यांनी पुन्हा पाटी-पेन्सिल हातात घेतली आणि ‘शिकण्यासाठी वय नसते’ हा संदेश कृतीतून समाजासमोर ठेवला.
-------------------
प्रथमचे मोलाचे योगदान
या उपक्रमाच्या यशामागे ‘प्रथम’च्या विक्रमगड टीमचे मोलाचे योगदान राहिले. टीम लीडर गोपीनाथ कोदे यांच्या नेतृत्वाखाली समीर माळी, प्रकाश काळे, भारती वारंगडे, प्रियंका कुरकुटे आणि रोहित वारंगडे यांनी सहा केंद्रांवरील कामाचे प्रभावी नियोजन केले. प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिक लक्ष देण्यात आल्याने हे यश शक्य झाले. विक्रमगडच्या दुर्गम भागातील महिलांनी मिळवलेले हे यश केवळ परीक्षेपुरते मर्यादित नसून, ते ग्रामीण समाजातील नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी मानले जात आहे. अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘सेकंड चान्स’ उपक्रम अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.