

खदानमाफियांचा मंडल अधिकाऱ्यावर हल्ला
विरारमध्ये तक्रारदाराच्या सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या
नालासोपारा, ता. १२ (बातमीदार) : विरार पूर्वेतील शिरगाव परिसरात दगड खदान प्रकरणाच्या पाहणीसाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्यावर खदान माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १२) घडली. या हल्ल्यात तक्रारदाराच्या सहकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून, मंडळ अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव आत्माराम पाटील असे असून, महेश पाटील आणि भालचंद्र पाटील यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विरार पूर्व शिरगाव परिसरातील एका दगड खदाणीबाबत अमित चौधरी यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तहसीलदार दीपक गायकवाड यांनी मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. प्रभाकर पाटील हे आपल्या खासगी चालकासह आपल्या चारचाकीतून दुपारी घटनास्थळी गेले होते.
पाहणीनंतर काही गैरप्रकार आढळून न आल्याचे त्यांनी तक्रारदाराला कळविले. मात्र, यानंतर तक्रारदाराने आत्माराम पाटील यांना घटनास्थळी पाठविले. खदान मालक आणि तक्रारदार यांच्यातील जुन्या वादातून आरोपींनी अचानक लाठी-काठ्या, लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, तर मंडल अधिकाऱ्यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने पंचनामा केला असून, घटनास्थळावरून फुटलेले मोबाईल, लोखंडी पहार आणि दगड जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर दुसरा मृतदेह सापडल्याची अफवा पसरली होती. मात्र, पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
---------------------
“जुन्या वादातून हा हल्ला झाला असून, एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. शासकीय अधिकाऱ्यावरही हल्ला झाला आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. ”
- सुहास बावचे, पोलिस उपायुक्त परिमंडळ ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.