औद्योगिक क्षेत्रात दूषित पाण्याचे तलाव

औद्योगिक क्षेत्रात दूषित पाण्याचे तलाव
Published on

रसायनांच्या दुर्गंधीने नाकीनऊ
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील चेंबरमधून विसर्ग

बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : तारापूर एमआयडीसीतील एका मोकळ्या भूखंडावरील चेंबरमधून रसायनयुक्त पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उन्हाळ्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी बाहेर पडत असल्याने आगामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचे पाणी आणि रासायनिक सांडपाणी एकत्र येऊन हे दूषित पाणी रस्त्यावर पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडले जात असून संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत; पण दूषित पाण्याने त्वचारोग, श्वसनाचे विकार तसेच गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
----------------------
कारवाईची मागणी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी प्रशासन, संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून चेंबरमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्याच्या स्रोताचा शोध घ्यावा. तसेच दोषी कारखान्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com