

रसायनांच्या गळतीने धावाधाव
जलवाहिनीलगत पाणी साचल्याने नवापूर ग्रामस्थ दहशतीत
बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रसायने समुद्रात सोडण्यासाठी टाकलेल्या वाहिनीला गळती लागल्याने नवापूर परिसरात खळबळ उडाली होती. या वाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून परिसरात साचलेले रसायनयुक्त पाणी टँकरच्या साहाय्याने हटविण्याचे कामही सुरू आहे.
नवापूर गावालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक पाणी साचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांची धावपळ झाली. गळती झालेल्या ठिकाणालगतच नवापूर गावासाठीच्या पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी आहे. त्यामुळे सांडपाणी मिसळल्यास आरोग्यविषयक परिणाम होऊ शकतात, अशी भीती ग्रामस्थांना सतावत आहे. गळतीनंतर परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने पिण्याच्या पाण्याची तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी होत आहे.
-------------------
रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीला गळती लागली होती; मात्र पिण्याच्या जलवाहिनीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक पाणी मिसळलेले नाही. गळती झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने सुरू आहे.
- शोएब सय्यद, सहाय्यक अभियंता
-----------------
वाहिनीला गळती लागल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होता कामा नये. ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊनच पुढील कामे करावीत. तसेच वारंवार गळती होत असल्याने प्रशासनाने कायमस्वरूपी तसेच ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- अधिराज किनी, ग्रामस्थ, नवापूर