अलिबागमध्ये देशातील पहिले अश्व आरोग्य तपासणी शिबिर

अलिबागमध्ये देशातील पहिले अश्व आरोग्य तपासणी शिबिर
Published on

अलिबाग पॅटर्न देशभर चर्चेत!
अलिबागमध्ये देशातील पहिले अश्व आरोग्य तपासणी शिबिर
ग्लॅन्डर्सविरोधात अलिबागची ऐतिहासिक मोहीम
३८० घोड्यांची तपासणी आणि ‘अश्व आरोग्य पत्रिकां’चे वितरण

अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) : पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये घोड्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात आलेला ‘अलिबाग पॅटर्न’ सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. अलिबाग नगर परिषद आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अश्व ग्लॅन्डर्स तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमांतर्गत तब्बल ३८० घोड्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून अश्व मालकांना ‘अश्व आरोग्य पत्रिकां’चे वितरण करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात एकूण १,२८३ घोडे असून त्यापैकी मोठा हिस्सा अलिबाग परिसरात कार्यरत आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी घोडेस्वारीची सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या घोड्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर ग्लॅन्डर्स या धोकादायक संसर्गजन्य आजाराविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
ग्लॅन्डर्स हा ‘बर्कहोल्डेरिया मॅली’ या जीवाणूमुळे होणारा गंभीर आजार असून तो घोडे, गाढवे आणि खेचरांमध्ये वेगाने पसरतो. विशेष म्हणजे, हा झुनोटिक आजार असल्यामुळे प्राण्यांकडून मानवामध्येही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटनाशी निगडित अश्वांची नियमित तपासणी आणि आरोग्य नोंदी ठेवणे अत्यावश्यक ठरते.
शिबिरादरम्यान तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घोड्यांची सखोल तपासणी केली. रक्ताचे नमुने घेऊन ते हरियानातील हिसार येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बाधित प्राणी आढळल्यास त्वरित विलगीकरण आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच घोड्यांच्या वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले असून २० अंकी कोडयुक्त ‘अश्व आरोग्य पत्रिका’ आणि अलीकडील निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
या मोहिमेमुळे घोड्यांच्या आरोग्य नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार असून भविष्यात ‘पशू आधार’ योजनेअंतर्गत त्याचा मोठा उपयोग होणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अलिबाग पॅटर्न राज्यासह देशासाठी आदर्श ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

ग्लॅन्डर्सविरोधातील कडक उपाययोजना
ग्लॅन्डर्सग्रस्त घोड्यांवर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. बाधित प्राण्यांना पशुवैद्यकीय समितीच्या देखरेखीखाली वेदनारहित मृत्यू दिला जातो. मृतदेह संसर्ग टाळण्यासाठी तत्काळ जाळणे किंवा खोल खड्ड्यात पुरणे बंधनकारक आहे. तसेच तबेले आणि परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी विशेष रसायनांचा वापर केला जात आहे.

‘अश्व आरोग्य पत्रिका’ ठरणार गेमचेंजर
‘अश्व आरोग्य पत्रिके’मुळे प्रत्येक घोड्याची ओळख, वैद्यकीय इतिहास आणि तपासणी नोंदी एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तसेच डिजिटल ट्रॅकिंगसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार असून अश्व व्यवस्थापनात पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com