

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : शहरात घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी धावपळ सुरू असून, नोंदणी करूनही गॅस बुकिंग आपोआप रद्द होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः डोंबिवली पश्चिमेतील एका गॅस एजन्सीविरोधात ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
काही महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्राहकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर काही दिवसांनी नोंदणी रद्द झाल्याचे संदेश मिळत असल्याच्या तक्रारी येत आहे. यासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागत असल्याने सिलिंडर मिळण्यासाठी १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. या समस्येसंदर्भात दररोज अनेक ग्राहक एजन्सी कार्यालयात फेऱ्या मारत आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून पुन्हा नोंदणी करा एवढाच सल्ला दिला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. नोंदणी नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द होते, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
काही ग्राहकांना घर बंद होते किंवा डिलिव्हरीवेळी संपर्क झाला नाही अशी कारणे दिली जात आहेत. मात्र, शहरातील अनेक छोटे व्यावसायिक आणि पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते घरगुती सिलिंडरचा वापर करत असल्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
व्यावसायिक वाढलेले दर टाळण्यासाठी काही जण घरगुती सिलिंडरचा वापर करत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यासाठी या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित गॅस एजन्सींवर कारवाई करावी तसेच सामान्य ग्राहकांना वेळेत गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.