

कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : एकीकडे नागरिक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसलेले असताना, दुसरीकडे प्रशासन आणि जलविभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात असल्याचे चित्र कल्याणमध्ये पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या अपव्ययामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कल्याण पूर्वेतील रेल्वे आरक्षण केंद्राजवळील मुख्य नाल्यातील मोठी जलवाहिनीला २० दिवसांपासून गळती होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची तक्रार रिक्षाचालक आणि नागरिकांनी केली आहे. हवामानातील बदल, कमी पावसाची शक्यता आणि घटणारी जलसाठ्यांची पातळी यामुळे अनेक भागांत आधीच पाणीकपात सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत जलवाहिनीमधून सातत्याने पाणी वाहत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकीकडे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असताना, दुसरीकडे गळती दुरुस्त करण्यात होणाऱ्या विलंबामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.
दरम्यान, गेल्या शनिवारी जलवाहिनी फुटल्याने शहाड पुलाखालील रस्त्याचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले होते. दोन दिवस सतत पाणी वाहत राहिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
टँकरमाफियांवरही आरोप
शहरातील पाणीटंचाईचा फायदा टँकरमाफिया घेत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. पाणीटंचाई वाढत असताना खासगी टँकरची मागणीही वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. पाण्याचा सातत्याने होणारा अपव्यय आणि समस्या सोडविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.