बांबू हस्तकला व स्मृतिचिन्ह विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांबू हस्तकला व स्मृतिचिन्ह विकास कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

हस्तकलेतून स्वावलंबनाचे धडे
पालघर जिल्ह्यातील २०० महिलांचा सहभाग
कासा, ता. १३ (बातमीदार)ः महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १२ ते २६ मे यादरम्यान बांबू हस्तकला तसेच स्मृतिचिन्ह विकास कार्यशाळा भरवली आहे. डहाणू तालुक्यातील घोलवड, बोर्डी, जव्हार, विक्रमगड येथे एकाचवेळी झालेल्या कार्यशाळेत २०० हून अधिक आदिवासी महिलांनी सहभाग घेतला होता.
बांबूपासून विविध हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य, स्मृतिचिन्हे तसेच दिवाळीत मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या आकर्षक कंदील निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. स्थानिक पारंपरिक कलेला आधुनिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे, उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेमुळे आदिवासी महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असून, त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होत आहे. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या हस्तकला वस्तूंमुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
-----------------------------
स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन
पावसाळ्यात डहाणू, बोर्डी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. तसेच दिवाळीच्या काळात बांबूपासून तयार करण्यात येणाऱ्या कंदिलांना मोठी मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कार्यशाळेतून महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com