

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : आगामी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थिती, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांचा प्रभावीपणे सामना करता यावा, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आपत्कालीन तयारीला वेग दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत कार्यरत असलेल्या टीडीआरएफ जवानांकडून विशेष प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष बचाव सराव सुरू करण्यात आला आहे.
पूरपरिस्थितीत नागरिकांचे तातडीने स्थलांतर आणि बचावकार्य प्रभावीपणे करता यावे, यासाठी जवानांना बोट चालविणे, पोहणे; तसेच पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली असून आठवड्यातून एकदा मासुंदा तलाव परिसरात प्रत्यक्ष सराव घेतला जात आहे. या प्रशिक्षणात टीडीआरएफच्या २९ जवानांचा सहभाग आहे.
मान्सून काळात अतिवृष्टी, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना; तसेच खाडीलगतच्या भागांमध्ये भरतीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र टीडीआरएफ पथक उभारले आहे. मागील वर्षी एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली या जवानांना विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यामध्ये प्रथमोपचार, पूरस्थितीतील बचावकार्य, डोंगराळ भागातील मदतकार्य, आग नियंत्रण, दरड दुर्घटना आणि इमारत कोसळल्यास करावयाच्या उपाययोजनांचा समावेश होता.
दरम्यान, यंदाही त्याच धर्तीवर बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागांत बोटींच्या साह्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, भरतीच्या वेळी पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे; तसेच आपत्कालीन मदत तातडीने पोहोचविण्यासाठी जवानांना विशेष सराव दिला जात आहे.
२२ बोटी सज्ज
महापालिकेकडून यंदा २२ बोटी सज्ज ठेवल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या मालकीच्या पाच, तर खासगी १७ बोटींचा समावेश आहे. साध्या बोटींसोबत पॅडल आणि मशिन बोटींचीही व्यवस्था केली आहे. मशिन बोटींद्वारे एका वेळी २५ नागरिकांचे बचावकार्य करणे शक्य होणार आहे.
……………….
तलाव परिसरात बोटी तैनात
मासुंदा तलाव, कचराळी तलाव, हरियाली तलाव, जेल तलाव, रेवाळे, कोलबाड, कळवा, आंबेघोसाळे, कौसा, खिडकाळी, दिवा आणि दातिवली या भागांमध्ये बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
हायलाईट्स
* २९ टीडीआरएफ जवानांचा सहभाग