वाहतूकीवर तोडगा काढण्यासाठी बैठक

वाहतूकीवर तोडगा काढण्यासाठी बैठक
Published on

वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी बैठक
तीन दिवस जनजागृती; त्यानंतर अनधिकृत पार्किंग व फेरीवाल्यांवर कारवाई

कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी डहाणू नगर परिषदेकडून बुधवारी (ता. १३) पारनाका येथील लोहाना सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुढील तीन दिवस जनजागृती मोहीम राबवून त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

डहाणू शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, पर्यटन व्यवसायातील वाढ तसेच लगतच्या शहरांमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगार व कर्मचारीवर्गामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेषतः डहाणू स्थानक रोड परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असून, रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी, अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांची वाढती संख्या तसेच दुकानदारांनी रस्त्याच्या लगत केलेले अतिक्रमण यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विशाल खत्री, डहाणू पोलिस अधिकारी किरण पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडधे, नगराध्यक्ष राजू माच्छी, बांधकाम विभागाचे अधिकारी नितीन पगारे, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

अनधिकृत फेरीवाले, रस्त्यालगत उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. मात्र, कारवाईपूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला असून, पुढील तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अक्षय गुडधे यांनी दिली.
----------------
शिस्त लागण्याची अपेक्षा
नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी वारंवार उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर तसेच नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत वाहतूक नियंत्रण, पार्किंगचे नियोजन आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने डहाणू शहरातील वाहतूक व्यवस्थेला काही प्रमाणात शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com