‘एक अखंड ज्ञानयज्ञ’ व्याख्यानमाला

‘एक अखंड ज्ञानयज्ञ’ व्याख्यानमाला
Published on

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ अधिक मासानिमित्त १७ ते २५ मे या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत ‘वैदिक ऋषी ते संत परंपरा : एक अखंड ज्ञानयज्ञ’ ही विशेष व्याख्यानमाला दररोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत होणार आहे. 
व्याख्यानमालेत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आणि प्रा. मेधा सोमण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, आर्य चाणक्य यांसारख्या महान विभूतींच्या कार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकणार आहेत. यासोबतच दररोज सकाळी ८ वाजता ‘गंगाकलश पूजन’ आणि सायंकाळी ‘गंगालहरी स्तोत्र’ पठण केले जाणार आहे.
‘तुलादान व धान्यदान’ उपक्रमांतर्गत जमा होणारे धान्य आणि साहित्य ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील २८ अनाथाश्रमांना वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय १३ जूनपासून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बालआंगण’ हा विशेष उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

व्याख्यानमालेची रूपरेषा
अधिकमास माहात्म्य आणि गंगादशहरा (१७ मे), संत ज्ञानेश्वर (१८ मे), वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी (१९ मे),  संत नामदेव (२० मे), भगवान परशुराम (२१ मे), संत एकनाथ(२२ मे), योगेश्वर याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास (२३ मे), संत तुकाराम (२४ मे), आर्य चाणक्य (२५ मे) अशा व्याख्यानमाला होणार आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com