खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पूर्वतयारी

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पूर्वतयारी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : आगामी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. शहरातील विविध प्रभागांतील रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या कामांसाठी दोन कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला असून, हा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण केल्याने खड्ड्यांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे काही भागांतील रस्ते खराब होण्याची शक्यता कायम आहे. विशेषतः महामार्ग आणि जुन्या रस्त्यांवर दरवर्षी खड्ड्यांची समस्या निर्माण होत असल्याने यंदा पालिकेने पूर्वतयारीवर भर दिला आहे. दोषदायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांकडून केली जाते. मात्र, त्या कालावधीनंतर खराब होणाऱ्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेवर येत असल्याने अशा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अलीकडेच घोडबंदर रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने त्या मार्गावरील देखभाल आणि खड्डे दुरुस्तीची जबाबदारीही आता पालिकेवर आली आहे. कोणत्याही यंत्रणेच्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत केवळ खड्डे बुजविण्यापुरते काम मर्यादित राहणार नसून आवश्यकतेनुसार डब्ल्यूबीएम, बीबीएम, डांबरीकरण तसेच काही भागांत गतीरोधक उभारणीची कामेही करण्यात येणार आहेत.

नऊ प्रभागांत निधीचे वाटप
पालिकेने नऊ प्रभाग समित्यांसाठी निधीचे वाटप केले आहे. त्यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभागासाठी सर्वाधिक ४० लाख रुपये, दिवा प्रभागासाठी ३५ लाख रुपये तर उर्वरित प्रभागांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नौपाडा-कोपरी, वागळे, उथळसर, कळवा, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर आणि मुंब्रा या प्रभागांचाही या योजनेत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com