

मोडकळीस आलेल्या गटारांमुळे नागरिक त्रस्त
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक २०-डी अंतर्गत ब्लॉक कंपनी, महात्मा गांधीनगर, डी. आर. पाटील क्वारी आणि बोनसरी गाव परिसरातील अंतर्गत गटारे व पदपथांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात पाणी साचणे, सांडपाणी रस्त्यावर येणे आणि घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या मते, अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली असून, सांडपाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसते. यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच पदपथ तुटलेले असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डी. आर. पाटील क्वारी व बोनसरी गाव परिसरात परिस्थिती अधिक गंभीर आहे. डोंगरावरून वाहून आलेल्या गाळामुळे गटारे पूर्णपणे भरली असून, काही ठिकाणी ती अस्तित्वातच नाहीत. यामुळे पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
चौकट
तातडीची दुरुस्ती आवश्यक
नगरसेवक चंद्रकांत अंगोडे यांनी प्रशासनाकडे जुनी गटारे तोडून नवीन आरसीसी गटारे उभारण्याची तसेच मजबूत पदपथ बांधण्याची मागणी केली आहे. वेळेत कामे न झाल्यास नागरिकांना मोठ्या आर्थिक व आरोग्याच्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निधी मंजूर करून कामे युद्धपातळीवर सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.