

अवजड वाहनांची मनमानी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रस्ते सुरक्षेला मोठा धोका
पालघर, ता. १३ : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांकडून रस्ते सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेषतः ट्रक, कंटेनर, ट्रेलर आणि इतर मालवाहू वाहनचालकांकडून लेनची शिस्त पाळली जात नसल्याने लहान वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावर वेगमर्यादा, ओव्हरटेकिंगचे नियम आणि सुरक्षित अंतर याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवत लहान चारचाकी वाहनांना अडथळा व डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई ते गुजरातदरम्यानचा हा महामार्ग देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. दररोज हजारो अवजड वाहने या मार्गावरून धावतात; मात्र अनेक वाहनचालक उजव्या लेनमध्ये सतत वाहन चालवून इतर वाहनांना मार्ग न देता वाहतूक कोंडी निर्माण करीत आहेत. काही ठिकाणी दोन-दोन ट्रक एकाच वेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात संपूर्ण रस्ता अडवून ठेवत असल्याने मागील वाहनांच्या रांगा लागत आहेत. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. अनेक ट्रकचालकांकडून हायबीमचा अतिरेक, अचानक लेन बदलणे, इंडिकेटरचा वापर न करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक केली जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कार, दुचाकी आणि प्रवासी वाहनांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. काही वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.
महामार्गावरील सीसीटीव्ही आणि टोलनाक्यांवरील यंत्रणा असूनही नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती अपुरी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः पालघर, मनोर, तलासरी, चारोटी आणि विरार परिसरात अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, महामार्गावर लेनची शिस्त ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अवजड वाहनांनी डाव्या लेनचा वापर करणे बंधनकारक असताना अनेक चालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते. लहान वाहनांना अचानक ब्रेक मारावे लागणे, वाहन घसरून अपघात होणे किंवा मागून धडक बसणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगितले जात आहे.
--------
माल लवकर पोहोचावा म्हणून काही अवजड वाहने वाहतूक नियमांची शिस्त पाळत नाहीत. वाहतूक शाखेने प्रयत्न केले तर ही शिस्त शक्य आहे; मात्र वाहतूक शिस्तीसाठी मार्गाच्या डाव्या बाजूने सर्वांगीण नियोजन आवश्यक आहे. पथदिवे, ब्लिंकर्स आदी नसल्यानेसुद्धा वाहने डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूने जातात.
- हरबन्स नन्नाडे, अखिल भारतीय वाहनचालक-मालक महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.