

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : आगामी पावसाळ्यात नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नियंत्रण कक्ष, रेल्वे, कोस्ट गार्ड, पोलिस आणि महापालिकेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर आरोप करण्याऐवजी तत्काळ उपाययोजना करण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. तसेच सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर राहून भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवावे. ज्या दिवशी समुद्रात उंच लाटा असतील, तेव्हा आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.
मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी नागरी संशोधन केंद्र येथील बैठकीत आयुक्त सौरभ राव बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील खड्डे दुरुस्ती, कोस्टल रोड परिसरातील सुरक्षा, उघड्या वाहिन्यांची तपासणी, रुग्णालयांतील औषधसाठा, पाणी निचरा व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांनी मान्सून काळात आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
घोडबंदर रोडवरील कामांबाबत कठोर भूमिका घेत ३० मेनंतर त्या मार्गावर कोणतेही काम सुरू दिसता कामा नये, असा कडक इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कोणत्याही प्राधिकरणाच्या अखत्यारितील रस्त्यावर खड्डे पडल्यास नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकाच त्यांची तातडीने दुरुस्ती करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील पाणी निचरा, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्याबाबत माहिती दिली. स्थानक परिसरात ब्लिंकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
वीज, आरोग्य यंत्रणांनाही आदेश
शहरातील उघड्या वाहिन्या आणि विद्युत खांबांची तपासणी करून शॉर्टसर्किट किंवा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना टाळाव्यात, असे निर्देश महावितरणला देण्यात आले. तसेच आपत्तीच्या वेळी वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाळी आजारांवरील औषधसाठा, खाटा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
......................
नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करणार
मान्सून काळात आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्यात येणार आहे. सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभाग समितीनिहाय स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देशही संबंधित सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले.
.......................
प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी
शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमावा. सर्व विभागांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तत्काळ समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण ठेवावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
सखल भागांवर विशेष लक्ष
शहरातील ज्या सखल भागांत दरवर्षी पाणी साचते, अशा ठिकाणांची यादी तयार करून तेथे पंप बसविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. पावसाळ्यात हे पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खात्री करण्यासोबतच प्रत्येक प्रभागात हायड्रा मशीन, पंपिंग यंत्रणा आणि मनुष्यबळ सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. कोस्टल रोडचे काम सुरू असलेल्या भागांमध्ये पाणी साचणार नाही, तसेच लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, यासाठी अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.