

विद्याविहार पादचारी पुलासाठी
शुक्रवारपासून विशेष ब्लॉक
गर्डर बसवणार; काही लोकल फेऱ्या रद्द, मार्गही बदलणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामासाठी १५ ते १८ मेदरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे कुर्ला ते भांडुपदरम्यान काही लोकल सेवांत बदल करण्यात आले असून काही फेऱ्या रद्द, तर काही मार्गांत बदल करण्यात आले आहेत. गर्डरचे काम रात्री तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे.
या ब्लॉकचा नियमित रेल्वे वाहतुकीवर विशेष परिणाम होणार नाही. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही कोणताही परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रवासी सुरक्षेसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
----
कामाचे वेळापत्रक
- शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत दाेन्ही दिशेच्या धीम्या मार्गांवर ब्लॉक असेल.
- शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१० ते पहाटे ४.४० या वेळेत दाेन्ही दिशांकडील धीम्या व जलद मार्गांसह पाचवी आणि सहावी मार्गिकाही बंद राहणार आहे.
- रविवारी मध्यरात्रीनंतर १.१५ ते पहाटे ३.०५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकल सेवांत बदल
- शनिवारी रात्री सीएसएमटीहून कर्जतकडे जाणाऱ्या काही धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाहीत.
- कसारा, बदलापूर आणि कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या काही लोकल सेवा जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
- या कालावधीत ठाणे-कुर्ला, ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-ठाणेच्या काही उशिराच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक लोकल कुर्ला, ठाणे येथेच समाप्त करण्यात येणार आहेत.
---
प्रवाशांना सूचना