म्हाडाची ६१० घरे उच्च उत्पन्न गटात

म्हाडाची ६१० घरे उच्च उत्पन्न गटात
Published on

म्हाडाची ६१० घरे उच्च उत्पन्न गटात
विक्रोळीतील प्रकल्पासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी लाॅटरी जाहीर केली आहे. त्यामधील कन्नमवारनगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील एमआयजीसाठी असलेल्या १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या घरांसाठी उच्च उत्पन्न गटातील लोकांना अर्ज करता येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांना सोडत प्रक्रियेत सहभाग घेता यावा, याकरिता मंडळातर्फे ऑनलाइन नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

मुंबई मंडळाच्या सोडतीतील कन्नमवारनगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १,२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत याआधीच ७.५ टक्के कपात करण्यात आली. त्यानंतर आता मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संगणकीय सोडत प्रणालीत हा बदल उद्या १४ मे दुपारी १२ पासून वाजता अद्ययावत करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सदनिकाधारकांना प्रत्येकी एक वाहनतळ (पार्किंग) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाधिक इच्छुक अर्जदारांना लाभ घेण्यात यावा, याकरिता मंडळातर्फे मुदतवाढ देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अल्प प्रतिसादामुळे निर्णय
म्हाडाने मुंबईतील २,६४० घरांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये लाॅटरी जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईतील घरांना सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा असतानाही कमी अर्ज आल्याने म्हाडाने पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली होती. विक्रोळी येथील मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती साडेसात टक्क्यांनी कमी केल्या आहेत. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत ७० हजार अर्ज आले असून सुमारे ४७ हजार जणांनी अनामत रक्कम भरून अर्ज अंतिम केला आहे.

कांजूरमार्ग डम्पिंगचा त्रास
म्हाडाच्या विक्रोळी कांजूरमार्ग येथील गृह प्रकल्पापर्यंत कांजूरमार्ग डम्पिंगची दुर्गंधी येते. त्यामुळे तेथील घरांसाठी नागरिकांकडून फारसे अर्ज येत नाहीत. त्यामुळे म्हाडाकडून या घरांच्या विक्रीसाठी किमती कमी करणे, पार्किंग देणे, असे उपाय केले जात असल्याची चर्चा आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com