

अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा निधी सरकारने अडविला
श्याम मानव यांची खंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : उपमुख्यमंत्री अजित पवार असताना अंधश्रद्धा निर्मूलनासाठी निधी मंजूर होत होता. मात्र, त्यांच्यानंतर राज्य सरकारने निधी अडविला असल्याची खंत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी व्यक्त केली. आमचा देवा-धर्माला विरोध नाही. हे सरकार बुवा-बाबांचे उद्दात्तीकरण करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भोंदूबाबा खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान दादर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात झाले. या वेळी प्रा. श्याम मानव बोलत होते. माजी पोलिस महासंचालक सुधाकर कासुराडकर, पालिकेचे माजी जलअभियंते मधुकर कांबळे आदी उपस्थित होते.
धिरेंद्र शास्त्री आणि माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भेटीवर श्याम मानव यांनी टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोण श्याम मानव, असा सवाल उपस्थित केला होता. या टीकेला उत्तर देताना मानव म्हणाले की, फडणवीस यांचे वडील माझे चांगले मित्र होते. फडणवीस यांना लहानपणापासून मी ओळखतो. माझ्याविषयी बोलताना सन्मान ठेवून बोला, असे उत्तर श्याम मानव यांनी दिले. राज्यात भोंदूबाबांना असेच खतपाणी मिळाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरोगामी महाराष्ट्र खलनायक म्हणून लक्षात ठेवेल, अशी टीकाही त्यांनी केली. आपल्या व्याख्यानात राज्यातील तसेच देशातील विविध बुवा-बाबांचा पर्दाफाश कसा केला, याबाबतची उदाहरणे मानव यांनी दिली.
----------------------
प्रभावी अंमलबजावणी नाही
२०१३ मध्ये राज्यात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला, पण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशोक खरातसारखे बाबा महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. धीरेंद्र शास्त्री समाजामध्ये अनेक अवैज्ञानिक दावे करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम वेगाने सुरू होते. मात्र, अलीकडे हे काम निधीअभावी मागे पडले. मात्र, प्रबोधन कार्यक्रमांच्या माध्यमातून निधीसंकलन करून आम्ही ते काम पुढे नेत आहोत, असेही मानव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.