

‘टाटा’च्या बैठकीविरोधातील याचिका मागे
याचिकाकर्त्याच्या वर्तनावर उच्च न्यायालयाने ठेवले बोट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सर रतन टाटा विश्वस्त न्यासाच्या संचालक मंडळाची शनिवारी होणारी बैठक रोखण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १३) नाराजी व्यक्त केली. तसेच हे धक्कादायक असल्याचे नमूद केले. त्यानंतर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.
मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार दिला होता. याचिकाकर्त्याला सुट्टीकालीन न्यायालयापुढे याचिका करण्याची मुभा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्ते सुरेश पाटीखेडे यांनी सुट्टीकालीन खंडपीठापुढे याचिका सादर केली. न्या. अद्वैत सेठना आणि न्या. संदेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्या वेळी याचिकाकर्त्याने याप्रकरणी स्वतः नाही, तर त्रयस्थ पक्षांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या निवेदनांच्या आधारे आदेश मागितल्याचे न्यायालयाने नमूद करून याचिकाकर्त्याची ही कृती धक्कादायक असल्याचे म्हटले. तसेच, प्रतिकूल आदेश देण्याचा इशारा दिला. पाटीलखेडे यांनी न्यासाच्या संचालक मंडळाच्या रचनेला आव्हान दिले होते व ही रचना १ सप्टेंबर २०२५ पासून सुधारित केलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता.