

तारापूरमध्ये पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती
दुसऱ्या अणुभट्टीचीही देखभाल-दुरुस्ती पूर्ण
पालघर, ता. १३ ः देशातील पहिल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्ट्यांतील तांत्रिक-देखभाल पूर्ण झाली असून पहिल्या अणुभट्टीतून वीज उत्पादन सुरू झाले आहे. आता दुसऱ्या अणुभट्टीच्याही देखभाल-दुरुस्तीचे कामही पूर्ण झाल्याने आता दोन्ही भट्ट्या वीज उत्पादनासाठी सज्ज आहेत. दुसरी अणुभट्टी सुरू करण्यासाठी भारतीय अणुऊर्जा महामंडळ आणि अणुऊर्जा नियमक परिषदेने नुकतीच परवानगी दिली आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्ट्यांमध्ये १९६९ मध्ये वीजनिर्मिती सुरू झाली होती. जानेवारी २०२० मध्ये केंद्रातील पहिल्या अणुभट्टीत तांत्रिक दोष आढळल्याने ती बंद करण्यात आली. त्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून १६० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. जुन्या अणुभट्ट्यांमधील वाहिन्या बदलून त्याठिकाणी पोलादी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यासह सुरक्षाविषयक खबरदारी आणि उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. आता दुसऱ्या अणुभट्टी क्रमांक दोनची तांत्रिक दुरुस्ती-देखभाल पूर्ण आहे. या दोन्हीही भट्ट्यांचे आयुष्यमान किमान दहा वर्षे असणार आहे.
---
टर्बाइनची कामे बाकी!
दुसऱ्या अणुभट्टीतील रिॲक्टर, कुलंट रिसर्क्युलेशन वाहिनी बदलण्यात आली. रिॲक्टर तसेच जड पाण्याच्या दाबासंदर्भातील तपासणी करण्यात आली. सध्या टर्बाइनसंदर्भातील काही कामे करणे बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या भट्टीमधील वीजनिर्मिती सुरू होईल, अशी माहिती अणुऊर्जा प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.